* दीड वर्षात ४,५०० रुग्णांना ऑनलाइन वैद्यकीय सल्ला
* ठाणे सिव्हिलचा लोकाभिमुख उपक्रम
ठाणे: आजारपणाच्या वेदनेसोबत दवाखान्यापर्यंत पोहोचण्याची धावपळही अनेकांसाठी मोठे आव्हान ठरते; अशावेळी तंत्रज्ञानाची सोबत आणि वैद्यकीय सेवेचा माणुसकीचा हात रुग्णांसाठी दिलासा ठरत आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या टेली-कन्सल्टेशन सेवेमुळे घरबसल्या ऑनलाइन वैद्यकीय सल्ला उपलब्ध होत असून, एप्रिल २०२५पासून आतापर्यंत तब्बल ४,५०० रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
या सेवेंतर्गत ताप, उलट्या, सांधेदुखी, ऑस्टिओआर्थरायटिस, सर्दी, डोकेदुखी, दुखापत, ॲलर्जी, डोळ्यांची जळजळ, मळमळ, ॲसिडिटी, जुलाब, बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि अशक्तपणा अशा विविध सामान्य आजारांवर ऑनलाइन वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही सेवा ज्येष्ठ नागरिक, दूरवरून येणारे व प्रवास करणे कठीण असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे. ‘उपचारांपासून कोणीही वंचित राहू नये’ या भावनेतून डिजिटल माध्यमाद्वारे वैद्यकीय सेवा घरापर्यंत पोहोचविण्याचा सिव्हिल रुग्णालयाचा हा उपक्रम आरोग्यसेवेतील लोकाभिमुख पाऊल ठरत आहे.
टेली-कन्सल्टेशनमुळे वेळ, प्रवासाचा खर्च आणि रुग्णालयातील प्रतीक्षेचा त्रास कमी होण्यास मदत होत आहे. प्राथमिक स्वरूपाच्या तक्रारींवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळत असल्याने गरजेनुसार पुढील उपचारासाठी रुग्णांना योग्य दिशा मिळते. त्यामुळे सिव्हिल रुग्णालयाची ही डिजिटल आरोग्यसेवा सर्वसामान्यांसाठी विशेषतः उपयुक्त ठरत आहे.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्यसेवा रुग्णांच्या दारापर्यंत पोहोचविणे, हाच टेली-कन्सल्टेशनचा मुख्य उद्देश आहे. ४,५०० रुग्णांचा प्रतिसाद ही सेवा जनतेच्या विश्वासाला उतरल्याची पावती आहे, असेडॉ. कैलास पवार यांनी सांगितले.